Below article is by Dr Maya Bhalerao from Pune who participated in Plastic surgery camp December 2019 at MAHAN Melghat.
सर्जिकल महामेळा@मेळघाट
डॉ माया भालेराव, पुणेसकाळी साडे सहा वाजता ट्रेनने बुऱ्हानपूर गाठले. घ्यायला आलेल्या गाडीत सामान टाकले आणि मेळघाटाच्या दिशेने प्रवास सुरु झाला.
नुकतेच झुंजूमुंजू झाले होते. दूरदूर पर्यंत माणूस, घरे काहीकाही दिसत नव्हते. आजूबाजूचा निसर्ग, ते आल्हाददायक वातावरण, तो जंगलाचा मंद दरवळणारा एक सुगंध, मध्येच आजूबाजूला दिसणारा हिरवागार परिसर मनभावन होता. माणसांच्या गर्दीतून आणि कॉन्क्रीटच्या जंगलातून बाहेर पडून इथे रमणीय निसर्गाच्या कुशीत अलगद शिरतांना खूप मस्त वाटत होते.
मेळघाटातला आजचा सुर्यादय नवीन उभारी- नवीन उर्जा देत होता. मी भरभरून घेत होते. बघता बघता कधी इच्छित स्थळी - महान चॅरिटेबल ट्रस्ट फॉर ट्रायबल पिपल ला येवून पोहोचले कळलेच नाही.
मेळघाट म्हणजे महाराष्ट्रातील जंगलांनी आच्छादलेला, डोंगरदऱ्यानी वेढलेला, वेड्यावाकड्या पळणाऱ्या सिपना नदीने घेराव केलेला, डोक्यावर आकाशाचे छत आणि पायाखाली धरतीची जमीन असलेला, पोटभर अन्न आणि अंगभर कपडे यांच्या पासून वंचित असलेला, सर्वात जास्त माता बाल मृत्यू आणि कुपोषित आदिवासी असलेला दुर्गम भाग !
ताटात आलेल्या पंचपक्वानाचा घास आणि वाट्याला आलेले स्थिर आयुष्य बाजूला सारून मेळघाटाच्या जंगलात स्थायिक होण्याचं धैर्य- त्याग याची तुलना कश्याशीही करू शकत नाही. त्यांच्या या महान कृत्याला लांबूनच फक्त ‘सलाम’ ‘HATS OFF’ म्हणण्यात मला तारतम्य वाटले नाही. काहीतरी योगदान दिलेच पाहिजे म्हणून दरवर्षी मेळघाटाच्या वारीचा मनसुबा केला.
ही मंडळी आरोग्याच्या सेवेपासून, त्याबद्दल असणाऱ्या जागृतीपासून कोसभर दूर आहेत. स्वच्छता- माहिती- तंत्रज्ञान यांच्या वाट्याला कधी येईल कोण जाणे ?
शिक्षणाचा अभाव असल्याने प्रचंड अज्ञान आणि अंध:श्रद्धा आहेत. त्यांना काही आजार झालायं, गाठ आहे- ती कॅन्सरची आहे की, साधी आहे, त्यावर इलाज होऊ शकतो, ऑपरेशन करून व्यंग काढू शकतो हे समजण्या इतपत त्यांची क्षमता नाही आणि आर्थिक कुवत तर नाहीच नाही.
तान्ह्या बाळाला PHIMOSIS साठी लघवीच्या जागी अनेक चटके देऊन बरे होईल हे त्यांचे मानसशास्त्र !
फ्रेश होऊन नास्ता करून OPD चा रस्ता पकडला. एकाच आवारात आहे हे सगळं. हॉस्पिटल मध्ये कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लागावी म्हणून लाल,पिवळ्या, निळ्या डस्टबीनने लक्ष वेधून घेतले. डॉआशिष- डॉ कविताची तळमळ प्रत्येक कोपऱ्यात दिसून येत होती. आवारात लावलेले सूचना फलक शिस्तबद्ध कामाची पद्धत दर्शवित होते.
रुग्णाची कॉम्पुटर लिस्ट तयार होती. ठसठशीत नाव लिहिलेल्या फाईल्स तयार होत्या. रक्ताच्या चाचण्या झाल्या होत्या आणि पेपरवर नमूद केल्या होत्या. संमती पत्र जोडले होते.
हॉस्पिटलच्या प्रांगणात गाव गोळा झाला होता. कोणाचे काय, तर कोणाचे काय ? पिशव्या, गाठोडी घेवून ही आदिवासी मंडळी ऑपरेशन साठी ४ दिवस राहण्याच्या हेतूने आली होती. त्यांना जाणे येणे शक्य नसते. आजूबाजूला कुठे चूल पेटवून चहाचे आधण दिसत होते, तर कुठे पोरं-बाळं बागडत होती. बाया-बापड्या, म्हातारे-कोतारे सर्व जण थंडीपासून बचाव म्हणून पागोटे गुंडाळून बसली होती.
प्लास्टिक सर्जरीच्या या कॅम्प मध्ये जन्मजात व्यंग असलेले, ओठ दुभंगलेले, हातापायाची चिकटलेली बोटे, भाजल्यामुळे आकुंचन पावलेली कातडी –स्नायू, कॅन्सरच्या गाठी असे बरेच रुग्ण होते. माझ्या नजरेतून थायरॉईड, पॅरोटीड, difficult intubation सुटले नाही.
रिसेप्शनला असणारी सिस्टर माईक वरून प्रत्येकाचे नाव पुकारून आत बोलवीत होती. नंबर आला कि त्या रुग्णाने फाईल घेवून आत यायचे ‘प्री अनेस्थेसिया चेकअप’ साठी. एका दिवसात सकाळी ते रात्री १२ तासात १७७ प्री अनेस्थेसिया चेक अप करून झाले. प्रत्येक पेशंटशी बोलून, कानात स्टेथोस्कोप लावून लावून कान दुखत होते. माझा स्टॅमिना संपला होता.
पण ऑस्ट्रेलियावरून आलेले डॉ. दिलीप गहाणकरी, जे प्लास्टिक सर्जन आहेत, दरवर्षी आपल्या मायदेशाबद्दल कृतज्ञता खातर येत असतात आणि विनामूल्य उपचार करून येथील अनेकांना सुंदर–सुकर-सुसह्य आयुष्य देऊन जातात, ते आणि डॉ आशिष -डॉ कविता सातव यांचे सर्जरीच्या दृष्टीने पेशंट बघण्याचे काम सुरु होते. नंतर मला सकाळी कळले कि रात्री ३ वाजता OPD संपली आणि मग OT लिस्ट तयार झाली.
सर्व चाचण्या करणे , ऑपरेशनची लिस्ट तयार करणे, सारं कसं नियोजन बद्ध. आधीच सर्वांचे रक्त तपासणी झाली होती. डॉ प्रशांत गहुकर याने हे सर्व फ्री करून दिले होते. २२० पैकी फक्त काही पेशंट वगळता सर्व अनेस्थेसियाच्या दृष्टीने योग्य होत्ते. आता पुढचे ३ दिवस सर्जरी करायचे होते.
रात्री ९ ला जेवण झाल्यावर OT कॉम्प्लेक्स मध्ये तयारी काय आहे ते बघू या म्हणून गेले. सीन फारच स्फूर्तीदायक होता. निर्जंतुक केलेले ऑपरेशनचे असंख्य ड्रम, निर्जंतुक कपडे, गाऊन्स, रुग्णांसाठी कपडे, ऑपरेशन्सची अवजारे -हत्यारे, भुलीची औषधे- इंजेक्शन्स, लागणारे SUTURE MATERIALS, स्पिरीट- बिटाडीनच्या बाटल्या, असंख्य सलाईनचे खोके ...बापरे ...काय तो जामानिमा ? ही तयारी बघून मला उद्याच्या कामाचा आढावा घेता आला. त्याची व्याप्ती समजली. या सर्वात #डॉ. #कविता तहान-भूक विसरून परिपूर्ण डुबून गेली होती.
सकाळी उठल्यावर मी तडक OT गाठले. एकदा का ऑपरेशन्सला सुरुवात झाली ते साडेचार वाजले तरी कळले नाही. सर्जनचे हात झपाझप चालत होते. पेशंट ऑपरेशन करून बाहेर जात होते. नवीन आत येत होते. नवीन अवजारे इकडे तिकडे धावत होते. वापरलेले बाहेर पडत होते. जणू काही दहा हात प्राप्त झाल्याची उर्जा माझ्यातही आली होती. माझी नजर चौफेर फिरत होती. वेगवेगळ्या पेशंटला लावलेले मॉनिटरचे ठोके वातावरण निर्मिती करत होते. आलबेल असल्याची नादमय किणकिण कानात सामावत होती. हातातली भुलीची इंजेक्शन्स हळुवार रुग्णाच्या शिरेत जात होती. एकावेळी OT मध्ये ४ सर्जन आणि ३-४ भूलतज्ञ, डॉ कविता आणि २२-२५ लोकं काम करीत होती. कुठेही धांदल नाही. जोरात आवाज नाही. सर्जन्सची आणि भूलतज्ञाची चिडचिड नाही. रुग्ण आत येताना एकदम शांत-संयमी वाटत होते. विशेषत: लहान मुलं सुद्धा बिनधास्त होती. अगदी गुणी बाळांसारखी. आलेली परिस्थिती त्यांना हा संयम शिकवत असावी. बराच वेळ उपाशी होती तरी त्यांचाही दंगा नव्हता.
“मै ऑपरेशन को आउंगी पर मुझे चॉकलेट चाहिये. मी “हो” म्हणताच ती चिमुकली मुलगी नाचत बागडत हातात स्वत:ची फाइल घेवून OT मध्ये आली. चेहऱ्यावर आनंद -उत्साह ओसंडून वाहत होता. तिचे ते बेधडक, स्वच्छंदी वागणे मला आवडले. लोकल भूल देऊन ‘छोटी गाठ’ काढायची होती. टेबलवर झोपवले ...एक इंजेक्शन दिले. काही रडारड नाही ...मनात विचार आला इतकी सोशिक कशी ही मुलं ?
दु:ख-वेदना, हार्डशिप इतकी वाटयाला आलेली असते कि त्यांना काय ते एका इंजेक्शनचे?
मी तिच्याशी गप्पा मारत मारत तिच्या आयुष्यात डोकावून बघण्याचा प्रयत्न केला. तर लक्षात आले करना हो पहचान उदास लोगोन्की .....
तो गौर से देखो ओ मुस्कुराते बहोत है...!
एकंदरीत प्रत्येक दिवशी रात्रीचे १२ होत असत ऑपरेशन संपायला. ३ दिवसात 133 ऑपरेशन्स करून उच्चांक गाठला. सर्व स्टाफचे कौतुक केले तितके थोडेच आहे.
खरं तर हा सर्जिकल महामेळा म्हणजे एक झंझावात!
मेळघाटातल्या रुग्णासाठी ..त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी झपाटलेल्या डॉ. आशिष, डॉ. कविता या आरोग्ययोगींचा !
एक सोहोळा ... एकत्र काम करण्याचा ...गरजूंना आरोग्य सेवा देण्याचा... खारीचा वाटा उचलण्याचा... अमुल्य योगदानाला हात लावून त्यांचे हात बळकट करण्याचा...!
असाच तो दरवर्षी होवो असे म्हटले तर थोडे वावगे होईल ...कारण सुदृढ समाज होवो असे वाटते....मग खुप ऑपरेशन होवो असे कसे म्हणणार? ...पण अशी वेळ आल्यास हम तुम्हारे साथ है किंवा हम साथ- साथ है म्हणायला काय हरकत आहे ?